दिनांक – २५/१२/२०२५.
आयोजक – दान पारमिता फाउंडेशन.

ठरलेल्या नियोजनानुसार २५ तारखेला सकाळ पासुनच मुंबई, नाशिक , रत्नागिरी , अमरावती इ. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लेणी संवर्धकांची लेणी वर जाण्याची ओढ वाखाणण्याजोगी होती आणि का नसणार बरं ! अरे, त्याचे कारणही तितकेच दमदार आहे नं ! एकतर लेणीचे नाव , ‘सुलेमान लेणी ‘ 🤔
आणि दुसरे ,पण महत्त्वपुर्ण “दुर्लक्षित”.हो ! हो! अगदी बरोबर ऐकलंत , दुर्लक्षित .
का बरं दुर्लक्षित????
असं काय आहे, तिथे ??
बरं अगदी २ किमी अंतरावरंच आहे … लेण्याद्री लेणी , ही लेणी म्हणजे इथे वसलेले मंदिर हे अष्टविनायक गणपतींपैकी एक – ओहोहो!!! किती ती गर्दी .
दुरूनच ती गर्दी पाहून डोळे पानावले कि विस्फारले तेच समजेना! पुढची शोकांतिका अशी ठरली की , तिथल्याच स्थानिकांना जेव्हा , सुलेमान लेणी कडे जाण्याचा रस्ता कुठला ही विचारणा केली असता , आम्हांला माहित नाही किंबहुना अशी कुठली लेणीच इथे नाही असा निरागस प्रतिसाद आम्हांला मिळाला .
पण , खरे सरांना फोन करून योग्य वाट मिळवून आम्ही आमच्या लेणीपर्यंत पोहोचण्यास आगेकुच केली.
आता थोडक्यात जुन्नर आणि सुलेमान लेणी यांविषयी माहिती सांगते ..
जुन्नर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक प्राचीन आणि ऐतिहासिक शहर आहे.सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले जुन्नर हे प्राचीन काळी व्यापार, राजकीय आणि धार्मिक केंद्र म्हणून ओळखले जात होते. सातवाहन काळात जुन्नरचे महत्त्व विशेष वाढले.
भौगोलिकदृष्ट्या,जुन्नर हे सह्याद्रीच्या कुशीत, घाटमार्गांच्या जवळ वसलेले आहे.त्यामुळे ते प्राचीन काळी कोकण – देश जोडणाऱ्या व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे ठाणे होते.
जुन्नर हे शहर एका कपाच्या आकाराच्या दरीत आहे .ज्याच्या पश्चिमेस शिवनेरी , उत्तरेस तुळजा टेकड्या , पुर्वेस सुलेमान टेकडी आणि दक्षिणेस मानमोडी टेकडी.हे कुकडी नदीच्या दक्षिण तीरावर आहे. मीना नदी देखील त्याच्या पश्चिमेस सुमारे पाच किमी अंतरावर वाहते.
या लेणींची निर्मिती साधारणतः इ.स. पहिल्या ते तिसर्या शतकादरम्यान झाल्याचे मानले जाते जेथे सुमारे ३० खडकात कोरलेल्या लेण्या असून त्यांपैकी बहुतेक लेण्या विहार स्वरूपाच्या आहेत, म्हणजेच बौद्ध भिक्षूंच्या निवासासाठी वापरल्या जात असत.काही लेण्या चैत्यगृह प्रकारातील असून त्यामध्ये स्तूप व प्रार्थना मंडप आढळतात. यावरुन थेरवाद बौद्ध परंपरेचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
जुन्नरमध्ये सर्वात जास्त खडक उत्खनन झाले आहे. सुमारे २५२.या मोठ्या संख्येने उत्खनन झालेल्या लेण्यांतून त्याकाळात श्रमण संप्रदायाला आधार देणारे हे एक अतिशय मोठे आणि समृद्ध शहर असल्याचे निदर्शनास येते.
केवळ खडक उत्खनन म्हणूनच याचे महत्त्व आहे असे नाही तर याचे महत्व वाढते ते इथे मोठ्या प्रमाणात सापडलेल्या शिलालेखांमुळे आणि नाण्यांमुळे
उदा. जुन्नर परिसरात रोमन साम्राज्याशी संबंधित नाणी आढळली आहेत, यावरूनच हे आंतरराष्ट्रीय व्यापारमार्गावरचे महत्तवाचे ठिकाण होते हे सिद्ध होते.
तर
” _सेट्ठिस्स नन्दसिरिस्स दानं”_
अर्थ – ” सेठ नंदसिरी यांनी दिलेले दान.”
शिलालेख
प्रामुख्याने दानशिलालेख आहेत.
यातला “सेठ” हा शब्द त्याकाळातील व्यापारी वर्गाचे आर्थिक सामर्थ्य आणि बौद्ध संघाशी असलेले निकट संबंध दर्शवितो.
लेणी , विहार , पाण्याची टाकी किंवा चैत्यगृह यांची निर्मिती व्यापारी वर्ग , सेठ ,गृहस्थ यांच्या दानातून झाली होती.
सांस्कृतिकदृष्ट्या जुन्नर , हे बौद्ध , हिंदू आणि जैन परंपरांचे संगम स्थळ आहे.
सुलेमान लेणी
सुलेमान लेणी, ज्यांना ‘कपिचित’ किंवा ‘गणेश पहाड’ असेही म्हणतात, या लेणी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराच्या उत्तरेस सुमारे ४.८ किलोमीटर (३.० मैल) अंतरावर असलेल्या सुलेमान डोंगरावर (Suleman Hill) स्थित आहेत. या लेणी बौद्ध धर्माशी संबंधित असून, त्या महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण प्राचीन लेणींपैकी एक आहेत.हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे.
येथील ,लेण्याद्री पाट्या पासुन दोन किमी अंतरावर असणारा लेणीसमुह म्हणजे ,’सुलेमान लेणी’.
इथे एक आनंददायी अनुभव असा आहे की , ज्या लेणीचे दर्शन घेण्यासाठी निघालो होतो तिथवर पोहोचल्यावर समजले की , तिथपर्यंत जाण्याचा रस्ता हा पुर्णपणे लपलेला आहे,आता काय करायचे ?🤔
पण कुठल्याही पुर्वतयारी शिवाय येतील ती दान पारमिता फाउंडेशनची टीम असूच शकत नाही अर्थातच , सुनील खरे सरांच्या नेतृत्वाखाली,टीम मधील काही पुरुष मंडळींनी हातात झाडू घेऊन लेणी पर्यंत जाण्याकडचा खडतर रस्ता ,जो खुप निमुळता आणि खोल दरीला लागून होता तो व्यवस्थित साफ केला नंतर दोरखंड एका टेकडीला बांधून दुसऱ्या बाजूपर्यंत महिलांना प्राधान्य देत ,एक- एक व्यक्तीला सुरक्षितपणे जिथे चैत्यगृह होते त्या लेणीपर्यंत सुखरूप पोहोचवले. सर्वांनाच मोठा गड पार केल्याचा अपार आनंद होतो न होतो तोच चैत्यगृहात शिरतानांच अनुभवता आलेल्या बुद्ध धम्म लहरींच्या तरंगांनी सर्व न्हाऊन निघालो.
हा अविस्मरणीय सुखद अनुभव नेहमीच काळजाजवळ राहिल अशी तिथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीच्या मनाची अवस्था झाली नसेल असे होणे नाही!
पण ,भगवान बुद्धांच्या शिकवणीनुसार,सर्वकाही अनित्य आहे क्षणभंगूर आहे याचा यथोचित परिचय प्रत्येकाला यावा याकरिता ,नेहमीप्रमाणे, सुनील सर आणि संतोष अंभोरे सरांनी सर्वांकडून आनापान ध्यान साधना करून घेत सर्वांचे चित्त शांत परंतू पावन धम्मलहरींनी भरून काढले.
नेहमीप्रमाणे लेणीची संपूर्ण माहिती देण्यात आली.
पहिल्यांदाच या चैत्यगृहात गेलो होतो आधी पाहिलेल्या चैत्यगृहांप्रमाणे याचे चैत्यगृह सुद्धा मोठे असेल असे वाटले होते पण आत शिरताच त्याची ,रूंदी २४९ सेंमी, लांबी – ६८०सेंमी (२२ फूट ४ इंच ) किंवा दरवाजापासून स्तूपापर्यंत ४६७ सेंमी (१५ फूट ४ इंच) आहे. स्तूपाचा व्यास १४७ सेंमी (४ फूट १० इंच) आणि उंची २८४ सेंमी ( ९ फूट ४ इंच) आहे.भिंती सरळ नाहीत ,ना जमिनीची पातळी सपाट आहे. स्तूपाच्या वरच्या भागाशिवाय आतील कोणताही भाग पुर्णपणे पुर्ण झालेला नाही. छताच्या मध्यभागापर्यंतची उंची ५५३ सेंमी (१८ फूट २ इंच) आहे.
बाहेरून , दर्शनी भागावर चैत्य खिडकीवर अलंकारांचे कोरीव काम आहे. या अलंकारांमध्ये स्तूप , बोधी वृक्ष, धम्मचक्र , फुलांच्या पाकळ्यांची नक्षी , पंचशील, आम्लक शिल्प इ.
हे पाहत असतांना ,भारतरत्न पुरस्कारात धम्मचक्र आहे तो इथूनच म्हणजेच, थेरवाद परंपरेतील लेण्यांतूनच घेतल्याची प्रचिती येते. चैत्यगवाक्षावर कोरलेले हे सर्व प्रतिक ही लेणी केवळ थेरवाद परंपरेचीच असल्याची ग्वाही देतात.
प्रतिकांचे स्वरूप –
बोधी वृक्ष (पिंपळपान) – भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीचे प्रतिक.
बोधिसत्व आणि धर्माचे प्रतीक आहे.पवित्रता,शांती आणि स्थिरता दर्शविते.
चैत्य – चैत्य,हे प्रामुख्याने प्रार्थना आणि ध्यानाचे केंद्र (चैत्यगृह) असते, ज्यात स्तूप असू शकतो आणि ते धर्माच्या शिकवणी आणि पवित्र स्थळाचे प्रतिनिधित्व करते.
स्तूप–
बौद्ध धर्मात स्तूप हे बुद्ध किंवा त्यांच्या शिष्यांच्या अस्थीधातू , केस धातू , दंत धातू इ.अवशेषांवर बांधलेले पवित्र स्मारक असून ते निर्वाण आणि पुनर्जन्माचे चक्र तसेच बुद्ध-धम्म-संघ या त्रिरत्नाचे प्रतीक आहे.
धम्मचक्र- बुद्ध – धम्म – संघाचे महत्त्वपुर्ण प्रतिक .बुद्धांच्या शिकवणी, अष्टांगिक मार्ग, प्रगती, आणि जीवन-मृत्यूच्या चक्राचे प्रतिनिधित्व करते, तसेच समता, बंधुता आणि न्यायाचे प्रतीक आहे, जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तनाद्वारे पुन्हा गतिमान केले.
स्वस्तिक जाळी – बौद्ध धर्मात स्वस्तिक हे बुद्धाच्या पावलांचे ठसे, समृद्धी, अनंतता, सद्भावना, आणि धर्माचे प्रतीक आहे, जे शुभ, कल्याण, आणि सकारात्मकतेचे प्रतिनिधित्व करते, तसेच ते अनेकदा शास्त्रांच्या सुरुवातीला आणि बुद्धाच्या शरीरावरही कोरलेले आढळते.
बुद्धाच्या 65 शुभ चिन्हांपैकी पहिले मानले जाते, जे त्यांच्या पावलांच्या ठशांवर कोरलेले आढळतात.
आम्लक शिल्प – आवळ्याचे शिल्प हे दान, आरोग्य, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जाऊ शकते.
फुलांची नक्षी –
बौद्ध धर्मात फुलांची नक्षी पवित्रता, अनित्यतेचे (क्षणभंगुर) जीवन, आध्यात्मिक जागृतीआणि आत्मज्ञान यांचे प्रतीक आहे.
जिथे कमळ हे चिखलातून उमलूनही शुद्ध राहिल्याने आत्मिक शुद्धता आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दर्शवते, तर पारिजात सारखी फुले स्वर्गीय सौंदर्य आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत.
आता इतकी प्रतिके एकाचवेळी एका इवल्याश्या लेणीच्या चैत्यगवाक्षावरील तीन सुंदर कमानींवर कोरलेली ही प्रतिके नाही का घेऊन जात आपल्याला भगवान बुद्धांच्या काळात ….! अगदी अशीच मनाची अवस्था झाली होती ते सर्व दैदिप्यमान शिल्पकाम पाहून .
क्षणभर थांबून , मनाच्या कवाडाची दालने उघडून नजरेने मनसोक्त आस्वाद घेत परतीच्या प्रवासाची सुरूवात केली.
परतत असतांना मनात एकच काहूर माजला होता की ,किती खडतर प्रवास करावा लागला तिथवर पोहोचण्यासाठी, रस्ता माहित नाही, स्थानिकांना लेण्याद्री व्यतिरिक्त सुलेमान लेणी किंवा गणेश पहाड सुद्धा आहे याची पुसटशीही कल्पना नसणं! पुरातत्व खात्याचे नोटीस बोर्ड अगदी खडतर खडक पार करतांना अगदी मध्यभागीच आहे परंतु लेण्याद्री पासून सुलेमान लेणी पर्यंत कसे पोहोचावे यांचे कुठलेही फलक किंवा मार्गदर्शक पर चिन्हे नाहीत ,ही मोठी शोकांतिका आहे या गोष्टीची खुप खंत वाटते की ,इतक्या सुंदर प्रतिकांनी , इतिहासाने नटलेली ही लेणी , दुर्लक्षित!!!
चिरं तिट्ठतू बुद्धसासन!
लेखक व संकलन – आशा मुकेश उके ✍️🪷

Discover more from Learn Pali ! Learn Buddha
Subscribe to get the latest posts sent to your email.
